🚓🚓 परिचराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल..🚓🚓
गोंदिया (दुर्योधन नागरीकर)
: मागील २७ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने विष प्राशन केल्याने मरण पावलेल्या ग्रामपंचायत परिचराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील ग्राम इर्री येथील हे प्रकरण असून रमेश नान्हू ठकरेले (४८, रा. इर्री) असे आत्महत्या करणाऱ्या मृत परिचराचे नाव आहे.तालुक्यातील ग्राम इर्री येथील रमेश ठकरेले यांनी ३१ मे रोजी दुपारी ग्रामपंचायतच्या आवारातच विष प्राशन केले होते. यावर त्यांना उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, उपचार घेताना शुक्रवारी (दि. २) दुपारी ४ वाजतादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सन २०१७ पासून त्यांचा पगार थकलेला होता.त्यावेळी तत्कालीन उपसरपंच रवीशंकर भाऊलाल तरोणे (३८) व ग्रामसेवक नरेश कमलप्रसाद बघेले (४२) यांनी थकीत वेतन देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. वेतनासंदर्भात विचारणा केल्यावर त्यांना वारंवार धमक्या देऊन नोकरी सोड, असे ते म्हणत होते. तसेच राजीनामा देण्यास दबाव आणत शिवीगाळ करून आर्थिक व मानसिक त्रास नवीन सरपंच देवानंद अभिमन गडपायले (५५) व उपसरपंच भाऊलाल लहू तरोणे (५४) यांनी दिल्याचे मृताची पत्नी सरस्वता रमेश ठकरेले (४८) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून म्हटले आहे. याप्रकरणी माजी उपसरपंच रवीशंकर तरोणे यांना अटक करण्यात आली आहे.
■ *एकाला अटक तीन फरार*
इर्री येथील परिचराच्या आत्महत्या प्रकरणात माजी उपसरपंच रविशंकर भाऊलाल तरोणे याला २ जून रोजी अटक करण्यात आली. तर या प्रकरणात ग्रामसेवक नरेश बघेले, सरपंच देवानंद गडपायले, उपसरपंच भाऊलाल तरोणे हे फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणेदार सचिन म्हेत्रे यांनी दिली आहे.
मृतदेहावर ग्रामपंचायतच्या आवारात चर्चा झाल्यावर अंत्यसंस्कार
इर्री येथील ग्रामपंचायत कर्मचारी रमेश नान्हू ठकरेले ४८ यांच्या पार्थिवाची ३ जून रोजी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रुग्णवा हिकेने मृतदेह इर्री येथील ग्रामपंचायत समोर नेण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास मृतदेह ग्रामपंचायतच्या आवारात ठेवणार होते. मृतकाचे जुने वेतन त्याच्या कुटुंबीयांना देण्यात यावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, मागण्या मान्य केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा गावकऱ्यांचा पवित्रा होता. यावेळी गोंदियाचे सहायक गटविकास अधिकारी डी. एस. लोहबरे यांनी इर्री ग्रामपंचायत गाठून लोकांची समजूत घातली. मागण्या रास्त असून त्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.