शेवटी प्रसाशना काडूनच होत आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा !
कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धावपळ : विभागीय अधिकारी रजेवर
इयत्ता बारावी, दहावी परीक्षेचा निकाल लागला. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने उराशी बाळगून पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी धडपड करीत आहे. परंतु त्यांच्या स्वप्नांचा चुराडा महसूल विभागाकडून होत असल्याचे मूर्तीमंत उदाहरण आमगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तिन्ही तालुक्याचे विभागीय अधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून सुटीवर आहे. मात्र, त्यांच्या जागेवर कोणतेही अधिकारी नसल्याने विद्याथ्र्यांच्या कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी होत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत.नागरिकांना, विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी बहुतांश कागदपत्रे आता ऑनलाइन देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.त्यासाठी महसूल
विभागाचे महाऑनलाइन हे संकेतस्थळ विकसित केले. सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांना जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न, डोमिसाईल आदी प्रमाणपत्रासह विविध कारणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे महाऑनलाइन संकेतस्थळावरून काढून दिली जातात. सध्या शैक्षणिक प्रवेश सुरू आहेत. तसेच भरती प्रक्रिया सुरू असल्याने प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे. दाखले मिळण्यासाठी विद्यार्थी, पालकांच्या सेतू केंद्रात चकरा वाढल्या आहे. तहसील कार्यालयातूनच विविध प्रमाणपत्रे मिळवावी लागतात. त्यासाठी लागणारी विविध प्रकारचे कागदपत्रे प्रमाणपत्र महाऑनलाइन सेतू केंद्रामार्फत तहसील कार्यालयात सादर करावी लागतात. तहसील कार्यालयातून कागदपत्रे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे डिजिटल स्वाक्षरी करिता ऑनलाइन सादर केली जातात.
या कागदपत्रांची आवश्यकता
विविध शाळा महाविद्यालयात प्रवेश घेताना शैक्षणिक कागदपत्रांसाठी जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न दाखला, नॅशनॅलिटी, डोमेसिल आदी कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे दिल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरी करून लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.