"आमदार साहेब, निदान बांधावर तरी या. पांढऱ्या कुर्ताची कशाला करता चिंता?"



"आमदार साहेब, निदान बांधावर तरी या. पांढऱ्या कुर्ताची कशाला करता चिंता?"



शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी दुरून पाहणी

• काय आमदारांना पांढऱ्या कुर्त्याची चिंता?

09 सप्टेंबरच्या रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शंभूटोला, महारीटोला या भागात शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटाची पाहणी करण्यासाठी आमदार सहसराम कोरोटे यांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी दौरा केला. मात्र, प्रत्यक्ष शेतात न जाता, त्यांनी दुरूनच नुकसान पाहिले, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे मत असे आहे की, आमदारांनी प्रत्यक्ष शेतात येऊन परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, आमदार साहेबांनी पांढऱ्या कुर्ताची काळजी घेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे टाळल्याची चर्चा आहे. काही शेतकऱ्यांनी आरोप केला की, "आमदारांचे कुर्ते खराब होणार म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यास तयार नाहीत."गेल्या पाच वर्षांत आमदार सहसराम कोरोटे यांची कामगिरी निराशाजनक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ते फक्त निवडणुकीच्या काळातच जनतेत दिसतात, असा आरोप शेतकरी आणि नागरिक करत आहेत. नुकसानीची पाहणी करताना आमदार कोरोटे शेतात न जाता, सुरक्षित अंतरावरून फोटो काढून आपली उपस्थिती दाखवत असल्याचेही लोकांच्या तोंडी आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,पाणीटंचाई, विजेच्या समस्या, शेतातील वाढते कर्ज आणि नापिकीमुळे शेतकरी आधीच संकटात होते. आता पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दलही ठोस पावले उचलली गेली नाहीत. "या दुर्दैवी परिस्थितीत आमदारांचे असे वर्तन अजिबात स्वीकारार्ह नाही," असे शेतकऱ्यानी सांगितले.याशिवाय, आमगाव नगरात मागील 15 दिवसांपासून नळाचे पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत, आणि या समस्येकडेही आमदार कोरोटे यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. "निवडणुकीच्या काळात फक्त फोटो काढण्यासाठीच आमदार दिसतात, पण प्रत्यक्ष काम करण्याचे मात्र त्यांना भान नसते," असे मत मतदारसंघात व्यक्त केले जात आहे.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, आमगाव देवरी मतदारसंघात आमदारांच्या अशा वागणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शेतकऱ्यांचा आणि स्थानिकांचा प्रश्न आहे, "फोटो काढण्यापलीकडे प्रत्यक्ष काम कधी होणार?"

Post a Comment

Previous Post Next Post