चाकाटे यांच्या प्रचाराचे नारळ फुटले; धूमशान सुरू
देवरी,दि.08 : गोंदिया जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोर, अपक्षांनी प्रचाराचे नारळ फोडले. जाहीर प्रचारासाठी आजपासून 10 दिवसांचा कालावधी असल्याने आता मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी नियोजन केले आहे. बैठका, जाहीर सभा, कोपरा सभांचे नियोजन करण्यात येत असून येत्या दोन दिवसांमध्ये राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे.विशेषता, आमगाव - देवरी विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाआघाडीत विधानसभेचा सामना रंगणार असल्याची चर्चा होती, मात्र महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विलास चाकाटे व महायुतीचे उमेदवार यांच्यात लढत असल्याची चर्चा मतदार संघात जोर धरु लागली आहे . आमगाव विधानसभा मतदार मतदारसंघांत काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे. राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बंड शमविण्याचा प्रयत्न केला. ज्यात काही प्रमानात बंडोबांना थंड करण्यात यश आले. मात्र उर्वरित महािकास आघाडीचे विलास चाकाटे यांनी महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विलास चाकाटे यांनी गाठीभेटी, पदयात्रांवर भर दिला आहे. त्यांचा प्रचारप्रारंभ आज शुक्रवार दुपारी 12.00 वाजता देवरी तालुक्यातील चिचगड वांढरा येथील चावळी वरच्या गणपती मंदिर येथुन सुरू केले आहे. यावेळी शेकडो कार्यकर्तासह चाकाटे यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.