गोंदिया (दुर्योधन नागरिक) : जिल्ह्यातील सर्वांत मोठी व सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत 'परिवर्तन' आणले आहे. बाजार समितीतील विद्यमानांना धक्का देत बाजार समितीवर चाबी संघटन व काँग्रेस प्रणीत परिवर्तन पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे. निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १४, सहकार पॅनलचे तीन, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला आहे.बाजार समितीत आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटन व काँग्रेस पक्ष प्रणीत परिवर्तन पॅनल, तर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार पॅनलमध्ये चांगलीच टक्कर होती. बाजार समितीवर माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे बंधू
सुरेश अग्रवाल यांचे वर्चस्व असल्याने यंदा विद्यमान आमदार विरुद्ध माजी आमदार असा संघर्ष असल्याने सर्वांच्या नजरा येथील निवडणुकीकडे लागून होत्या. अशात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले व शनिवारी (दि. २९) निकाल जाहीर करण्यात आला.यात परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले असून पॅनलने प्रस्थापितांना धक्का देत बाजार समितीवर कब्जा केला आहे. निवडणुकीत सहकार पॅनलला फक्त तीनच जागांवर, तर शिवसेना उद्धव गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले .