*पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया*
*आत्म समर्पित नक्षल राजूला हिची यशस्वी भरारी*
गोंदिया - श्री. निखिल पिंगळे, श्रीमती- समृद्धी पिंगळे, यांचे हस्ते सत्कार. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आत्म समर्पित नक्षल कु. राजुला अनिता रवेलसिंग हिडामी, वय 21 वर्षे राहणार - लवारी, पोस्ट- पुराडा, ता- कुरखेडा, जि. गडचिरोली हीला नक्षलवाद्यांनी जबरीने नक्षल चळवळीत जुलै 2017 (KKD दलम, पक्ष सदस्य म्हणून), सहभागी करून घेतले होते. परंतू नक्षलवाद्यांबरोबर राहून जिवन जगत असतांना तिला येणाऱ्या अडचणीमुळे ती कंटाळली होती. तीला नक्षल (संघटनेत) चळवळीत स्वारस्य नव्हते. त्यामुळे तीने गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तारीख 24/08/2018,रोजी शरणागती पत्करली होती. गोंदिया जिल्हा पोलिसांना शरणागती पत्करल्या नंतर पोलीस दलातर्फे तत्कालीन पोलीस अधीक्षक, श्री.बैजल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आटोळे यांचे प्रयत्नाने कु. राजुला हीचे पुनर्वसन करण्यात येवुन शासनाच्या आत्म समर्पण योजनेच्या माध्यमातून ती अगोदरची 7 वी पास असल्याने व तीला पुढे शिकण्याची इच्छा व आवड असल्याने तीला सन 2018 मध्ये देवरी येथील सरकारी शाळेत 8 वी मध्ये प्रवेश देण्यात आला होता पुढे गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे सहकार्याने नियमित शिक्षण घेत जून 2021 मध्ये तिने 10 वी ची परीक्षा मध्ये 51. 80% गुण मिळवून उत्तीर्ण केली. त्याचप्रमाणे मनोहरभाई पटेल ज्यु. कॉलेज देवरी येथे शिक्षणं घेत असताना तिने 2023 मध्ये 12 वी ची परीक्षा दिली असून तिने 46% गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे.
कुमारी राजुला हिने माओवादी विचारसरणीला डावलून, हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यानंतर अथक परिश्रम घेवून 10 वी, 12 वी चे शिक्षणं पुर्ण करीत घेतलेली यशस्वी भरारी कौतुकास्पद असल्याने तिचा सन्मान म्हणुन आज दिनांक 27/05/2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया कॉन्फरन्स हॉल येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे व श्रीमती समृद्धी पिंगळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला व तिच्या भावी पुढील वाटचाली साठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी कु. रजुला हिने आपले मनोगत व्यक्त करताना पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पोलिस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तिचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. सदर सत्कार कार्यक्रमा प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. दिनेश तायडे, श्रीकांत हत्तीमारे , तसेच नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.