✒️✒️ 📚📚शैक्षणिक साहित्याला महागाईचा चटका, तरिही घ्यावे तर लागणार 📚📚✒️✒️
गोंदिया : उन्हाळ्याची सुटी आता संपत आली असून, शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी सुरू झाली आहे. खरेदीसाठी शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य पालकांसह विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारपेठेतील सर्वच शैक्षणिक वस्तू महागल्या आहेत. साहित्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढलेले आहेत. दिवसेंदिवस शिक्षण महाग होत आहे. शैक्षणिक साहित्यासह खर्च वाढत आहे. दप्तराचे ओझे कमी होत असले तरी शाळेचा खर्च कमी होताना दिसत नाही. इंग्रजी माध्यमांची पुस्तके खरेदी करावी लागतात. पालकांना शालेय साहित्याची गरज नसतानाही पुस्तकांबरोबरच ते खरेदी करावे लागत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे काही ठिकाणी शालेय साहित्य उपलब्ध नाही.विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्र, फुले, पक्षी, प्राणी, कार्टून यांना पसंती दिली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा शैक्षणिक साहित्याच्या दरामध्ये वाढ झाल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. कच्च्या कागदाचे भाव वाढल्याने ही वाढ झाल्याचे काही व्यावसायिक सांगत आहेत. बाजारात नवनवीन नोटबुकसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहे.जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.शालेय साहित्यात विविध कंपन्यांच्या वह्या, पेन, कंपास पेटी, स्कूल बॅग, बूट, गणवेश आदी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ झाली असली, तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालक ते विकत घेत आहेत.
पालकांच्या खिशाला फटका..
विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुस्तके, वह्या, गणवेश व अन्य साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य पालकां मधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळांची पहिली घंटा १ जुलै रोजी वाजणार आहे. वाढत्या महागाईमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे. सामान्यतः कच्चा माल, पेट्रोल व डिझेल यांचे भाव वाढल्यामुळे यावर्षी शैक्षणिक साहित्यही महागल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दप्तर, वह्यांचे दर वाढल्याचे दिसून येते.