डॉ. परिणय फुके यांच्या पत्रावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची कठोर भूमिका, भेलला अंतिम नोटिस जारी
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी साकोली तालुक्यातील मुंडीपार गावातील २७० शेतकऱ्यांची ५१०एकर जमीन संपादित करून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कारखाना उभारण्यात येईल, असे स्वप्न दाखवले गेले, परंतु आज नऊ वर्षे उलटली तरी त्या संपादित जमिनीवर भेलने प्रकल्प आणला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांवर अन्याय करण्यात आला.भेलच्या या प्रकरणाबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे सुरुवातीपासूनच संघर्ष करून जिल्ह्यात नवनवीन उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या या ५१० एकर मुंडीपार येथील जमिनीवर भेलने ९वर्षांत कोणतेही काम केलेले नाही आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा द्वारे वारंवार पाठविण्यात आलेल्या नोटीसीचेही उत्तर दिलेले नाही, ही गंभीर बाब परीणय फुके यांनी मांडली.ही बाब गांभीर्याने घेत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन भेलने संपादित केलेल्या जमिनीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच या जमिनीवर एमआयडीसीमार्फत इतर महत्त्वाचे उद्योग सुरू करण्याची मागणी शासनस्तरावर केली. ते म्हणाले, औद्योगिक क्रांतीचे नवे आयाम प्रस्थापित झाल्यास भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल.डॉ. फुके यांनी उपस्थित केलेल्या या गंभीर विषयाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत भेलबाबत कठोर भूमिका दाखवून अंतिम नोटीस पाठविण्याचे निर्देश दिले. मंत्री सामंत यांच्या सूचना मिळताच भेलला अंतिम नोटीस बजावून १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले. भेलकडून उत्तर न आल्यास एमआयडीसी त्या ठिकाणी इतर औद्योगिक व्यवसायासाठी शासनस्तरावर कारवाई करणार आहे.