दुर्योधन नागरीकर (गोंदिया)
जिल्ह्यातील जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुने शिक्षक पुन्हा शिकवायला येणार असल्याने विद्यार्थी वेलकम बॅक गुरुजी म्हणणार आहेत.शिक्षक भरतीसाठी बनवलेल्या 'पवित्र' या ऑनलाइन प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीद्वारे शिक्षक नेमण्यात बराच वेळ जाणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय ७ जुलै रोजी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.नियोजित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे भरती प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काढले. सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी कमाल आहे. वयोमर्यादा ७० वर्षे असून दरमहा २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करणे आवश्यक आहे.
■ करार पत्र भरुन घ्यावे लागणार
नियुक्तीच्या कालावधीत शिक्षक पदाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अटी-शर्ती मान्य असल्याचे करार पद्धतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत किया इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकाची १०० रिक्तपदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.