शैक्षणिक क्रांतीचे उगम स्थान भिडेवाडा झाकला, पंतप्रधानांना दिसेल कसा?
वृत्त संकलन धिरज ठाकरे
: सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक क्रांतीचे उगम स्थान, मुलींची पहिली शाळा भिडेवाडा, अगदी दगडूशेठ मंदिराच्या समोरचे हे महत्त्वाचे ठिकाण मंडपाच्या झगमगाटात झाकले गेले. पंतप्रधानांनी येथे जाणे फार गरजेचे होते, पन्नास कोटी मंजूर झाले होते, दोन दिवसांत कामही सुरू होणार होते; मग काय झाले? ही वास्तू का झाकली गेली?, असा प्रश्न शॉर्ट फिल्म दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौन्यावर आलेले असताना दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे भव्यदिव्य डेकोरेशन करण्यात आले होते. या मंडपाच्या नावाखाली मंदिरासमोरील भिडेवाडा झाकण्यात आल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील वेगवेगळ्या पुरोगामी संघटना एकत्र आल्या होत्या. ज्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला गेला, अशा भिडे वाड्याचा इतिहास जपण्यासाठी येथील संघटना काम करत आहेत. मात्र, नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप या संघटनांकडून करण्यात येत आहे.
•भिडेवाडा ही पुण्यातील बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे. या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यानी १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. यात शिक्षण देण्याच काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले.