विद्यापीठाचा अफलातून निर्णय
सुमित ठाकरे / सालेकसा
तालुक्यातील आदिवासी बाहुल भागातील जी के कला व विज्ञान महिला महाविद्यालय कावराबांध येथील विद्यार्थिनींना परीक्षा केंद्र बदलल्यामुळे पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून परीक्षेसाठी सालेकसा येथे जावे लागत आहे. एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील नियमित परीक्षा केंद्र ऐन परीक्षेच्या तोंडावर बदलण्याचा अफलातून निर्णय विद्यापीठाने घेतला असल्यामुळे या निर्णयावर व विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विद्यार्थिनींनी रोष व्यक्त केला आहे. विद्यापीठाने हा निर्णय मागे घेऊन पूर्वस्थिती कायम करावी किंवा 850 विद्यार्थिनींची संख्या असलेला जी के कला व विज्ञान महाविद्यालयालाच नवीन परीक्षा केंद्र जाहीर करावे अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की आमगाव सालेकसा तालुका हे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेकसा मार्गावरील कावराबांध येथे अनुदानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित जी के कला व विज्ञान महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील मुली सायकल किंवा पायी या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. यापूर्वी या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे परीक्षा केंद्र एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील विना अनुदानित महाविद्यालयात होते. हे परीक्षा केंद्र फक्त एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी व वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होते. नुकतीच 15 मे पासून पदवीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना किंवा कावराबांध येथील महाविद्यालयाला कुठली पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र महाविद्यालयापासून 15 किलोमीटर लांब अंतरावर देण्यात आले. परीक्षेच्या दोन दिवसापूर्वी मिळालेल्या हॉल तिकीट द्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एम बी पटेल महाविद्यालयात असल्याचे कळले. विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना धक्काच बसला. काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र 25 ते 30 किलोमीटर लांब आहे. या मार्गावर वेळेवर बस ची सोय नाही. या नक्षल प्रभावित भागातून सायंकाळी परत येण्यासाठी बस ची संख्या फारच कमी असल्यामुळे पालकांना मुली घरी परत येण्यापर्यंत काळजी असते.
अचानक परीक्षा केंद्र बदलल्यामुळे महाविद्यालयातील शिक्षकही संभ्रमात आले. महाविद्यालयाने सुद्धा विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता नागपूर विद्यापीठ परीक्षा विभागाला पत्राद्वारे परीक्षा केंद्र बदलून मिळण्यासाठी विनंती केली परंतु विद्यापीठाने या समस्या कडे लक्ष दिले नाही व परीक्षा केंद्र सालेकसा येथील एम बी पटेल महाविद्यालयात दिला. या परीक्षा केंद्रावर जीके महाविद्यालय कावराबांध, मोहोजारे महाविद्यालय पानगाव, साखरीटोला महाविद्यालय साखरीटोला, गजानन महाविद्यालय आमगाव व एम बी पटेल महाविद्यालय सालेकसा असे एकूण पाच महाविद्यालयाचे जवळपास अडीच हजार परीक्षणार्थीं परीक्षा देतात. परीक्षार्थींची संख्या जास्त असल्यामुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र एक किलोमीटर अंतरावरील विनाअनुदानित गवराबाई महाविद्यालय झालिया येथे फक्त त्यांच्याच विद्यार्थ्याकरिता परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाचा हा निर्णय फारच अफलातून वाटत असून हे विद्यापीठाने हेतू पुरस्कर केले असावे अशी शंका व्यक्त होत आहे.विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाने हा निर्णय रद्द करून ते पूर्ववत करावे किंवा जीके महाविद्यालयात नवीन परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे.