स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यास विरोध
काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
सुमित ठाकरे/ आमगाव : विजेचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहे. हे मिटर एखाद्या मोबाईलप्रमाणे कार्य करणार आहे. रिजार्च संपला की मोबाईलची सेवा बंद होईल. याचा ग्राहकांना मनस्ताप होईल. तसेच काही खासगी कंपन्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे स्मार्ट प्रिपेड मीटर लावू नका, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना पाठविले आहे. संजय बहेकार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.शासन निर्णयानुसार स्मार्ट मीटर्स, ट्रान्सफॉर्मर मोटर्स, फीडर मीटर्स व संबंधित सुविधा यासाठी एकूण ३९ हजार ६०२ कोटी रुपये खर्चाच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. यात ६० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे तर उर्वरित ४० टक्के रक्कम ही महावितरण कंपनीने कर्जाद्वारे उभी करावयाची आहे. ही रक्कम त्यावरील व्याजासह कंपनी भरणार आहे. त्यासाठी कंपनी आपल्या पुढील २०२४ अखेरीस दाखल करणार असलेल्या दरवाढ प्रस्तावामध्ये ही रक्कम मागणी करणार हे वास्तव आहे. आधीच वीज दरवाढीने त्रस्त जनतेला कराच्या रूपाने वीज दरवाढीचा अतिरिक्त ओझा टाकण्यात येईल. सोबतच महावितरणच्या अकाउंट व बिलिंग विभागातील मीटर रिडींग, वीज बिल करणारे, बिल वाटप करणारे खंडित वीजपुरवठा सुरू करणारे, मीटर टेस्टिंग यासारख्या अनेक विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणारे हजारो कर्मचारी बेरोजगार होतील. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याबद्दल उपाय काय याचा स्पष्ट खुलासा अद्याप शासनाने केला नाही. त्यामुळे हे धोरण रद्द करावे, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस कमेटी आमगाव पिंकेश शेंडे अनु. जाती उपाध्यक्ष,कॉंग्रेस कमेटी आमगाव, जगदीश चुटे जिल्हा माहासचिव ओ.बी.सी. विभाग, व तसेच अन्य कार्यकरते कॉंग्रेस कमेटी आमगाव उपस्थित होते.