मग्रारोहयोच्या अकुशल कामांची मजुरी रक्कम तात्काळ उपलब्ध करा - मिथुन मेश्राम
शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात अकुशल कामे करण्यात आली. या कामावर हजारो मजुरांनी उपस्थिती लावली होती. म सदर कामे पूर्ण होवून तब्बल महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र संबंधित कामांची मजुरांना अद्याप मजुरी उपलब्ध करण्यात आली नसल्याचां आरोप करीत अकुशल कामांची मजुरी तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.ही मागणी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे. ते म्हणाले की ग्रामीण भागातील हजारो मजुरांना उन्हाळ्यात मजुरी कामे उपलब्ध होण्यासाठी दरवर्षी मग्रारोहयो अंतर्गत अकुशल कामे सुरू केली जातात. या कामावर ग्रामीण भागातील हजारो महिला पुरुष मजुरी कामे करताना दिसून येतात. दरम्यान यंदा उन्हाळ्यात मग्रारोहयो अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मजुरीचे अकुशल कामे करण्यात आली आहेत. या कामावर तालुक्यातील हजारो मजुरांनी मजुरी कामे केली आहेत. तथापि सदर मजुरी काम पूर्ण होवून महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र या कामांतर्गत हजारो मजुरांना अद्यापही मजुरी उपलब्ध करण्यात आली नसल्याची ओरड आहे. दरम्यान सद्या खरीप हंगाम अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेत पीक लागवड सुरू आहे. मात्र या कामांसाठी बहुतांश मजूर शेतकऱ्यांना मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या अकुशल कामांची मजुरी उपलब्ध न झाल्याने अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.या परिस्थितीत शासनाने मग्रारोहयो च्या अकुशल कामांची मजुरी तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मिथुन मेश्राम यांनी केली आहे.