केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत ‘महाज्योती’चा करार
गोंदिया: GONDIA देशात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविण्याचे मोलाचे कार्य क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) काम करीत आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना जीवनावश्यक कौशल्ये मिळणे अत्यावश्यक आहे. त्यात सुरक्षा व आरोग्याचा देखील समावेश आहे. याच उद्देशाने ‘महाज्योती’ने महाविद्यालयातील सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षण आणि योगाचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.या उपक्रमासाठी महाज्योतीने केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले आणि स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीन झहीद यांनी स्वाक्षरी केली. या प्रसंगी महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे व प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे उपस्थित होते.महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती केंद्र सरकारच्या विविध सेक्टर स्कील कौन्सिल मार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण राबवित असते. स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिलच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स व फिटनेस संबंधित जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यात प्रात्यक्षिकांचा देखील समावेश असेल. या प्रशिक्षणानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एनएसडीसी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणासाठी व फिटनेस कोच म्हणून करिअर करण्याची संधी देखील मिळू शकेल.
**प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे मंत्री अतुल सावेंचे आवाहन**
महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी विद्यार्थिनींना या अभिनव स्व-संरक्षण प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांचे जीवन कौशल्ये विकसित होतील.
**प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये:**
1. मोफत १५० तासांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक
2. मान्यताप्राप्त व अनुभवी प्रशिक्षक
3. प्रशिक्षणानंतर एनएसडीसीचे प्रमाणपत्र
4. फिटनेस किंवा सेल्फ डिफेन्स कोच म्हणून करिअर करण्याची संधी