राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी घेणार आक्रमक भूमिका
मोरगाव/अर्जुनी व आमगाव विधानसभेची जागा न सुटल्यास...
गोंदिया, महाविकास आघाडीच्या वतीने मोरगाव/अर्जुनी व आमगाव विधानसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. हि जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला न सोडल्यास कार्यकर्ते टोकाची भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडिया माध्यमातून आपली भुमिका कणखरपणे मांडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याकडे सर्व जिल्हा वासियाचे लक्ष लागले आहे. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. गोंदिया जिल्ह्यांत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुन्हा भरारी घेणार का..? याकडे सर्व जिल्हा वासियाचे लक्ष लागले होते. मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा उभी करण्यासाठी युवा नेता मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी मिळाली. जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षांची धुरा सांभाळण्यासाठी कुणीही समोर सरसावले नव्हते. मात्र युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आज जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे. दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते महायुती चे काळे कारनामे जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. स्वाभिमानाची तुतारी विधानसभेत गाजणार याकडे आसं घेऊन आहेत. मोरगाव/अर्जुनी व आमगाव विधानसभेत महाविकास आघाडीत धुसपूस सुरु झाली आहे. मोरगाव/अर्जुनी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजकुमार बडोले तर आमगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून संजय पुराम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झाली नाही. त्यात मोरगाव/अर्जुनी व आमगाव विधानसभेची जागा आपल्या पदरात पडावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. संपुर्ण जिल्ह्याची धुरा सांभाळणारे कणखर नेतृत्व करणारे मिथुन मेश्राम उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहेत तर आमगाव विधानसभा मतदारसंघातील जन सामान्यांच्या प्रश्नांना घेऊन पायाला भिंगरी बांधून संपूर्ण विधानसभा मतदारसघ पिंजून काढणारे युवा नेतृत्व विलास चाकाटे यांनी दि. २४ तारखेला पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली आहे. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारीवरून नाराजगी पसरली असून महाविकास आघाडीत ठिणगी तर पडणार नाही ना...? तर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणार का याकडे लक्ष लागून आहे.