वाघिणीचा गोंदिया मार्गे आता आमगाव तालुक्याकडे प्रवास
बात्मी संकलन बालू वंजारी
जिल्ह्यातील नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून भरकटलेल्या वाघिणीने मागील दोन महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चांगलेच जेरीस आणले आहे. गुरुवारी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी चंगेरा परिसरात दाखल झालेल्या वाघिणीने शुक्रवारी (दि.७) दुपारी पुन्हा आपला मार्ग बदलविला आहे. कामठामार्गे आता आमगाव तालुक्यातील घाटटेमनीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे कामठा, घाटटेमनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातून आणलेल्या दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. आठ-दहा दिवसांनंतर या दोन वाघिणींपैकी एक वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून भरकटली होती. ही वाघीण सडक अर्जुनीमार्गे गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार हिरडामाली परिसरात दाखल झाली होती त्यानंतर या वाघिणीने आपल्या मोर्चा गोंदिया तालुक्याकडे वळविला तालुक्यातील पांगडी जलाशय परिसरात जवळपास दीड महिना मुक्काम केला. त्यानंतर ही वाघीण गुरुवारी (दि.६) भरकटत रावणवाडी चंगेरा परिसरातील राजा राणी जंगल परिसरात दाखल झाली होती. त्यामुळे वन विभागाचे पथक रावणवाडी व चंगेरा परिसरात तळ ठोकून होते. शुक्रवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास या वाघिणीने हा परिसर सोडत कामठा व घाटटेमणी परिसराकडे आपला मोर्चा वळविला. या वाघिणीला जीपीएस टॅगिंग लावले आहे. त्यावरून वन विभागाच्या चमूनेसुद्धा या वाघिणीचे लोकेशन कामठा घाटटेमणी परिसरात दाखवीत असल्याचे सांगितले. या परिसरात वाघीण दाखल झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच रात्रीच्या वेळेस एकटे घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
• दोन पथके वाघिणीच्या मागावर
जीपीएस नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून भरकटलेल्या वाघिणीला परत व्याघ्र प्रकल्पात परतावून लावण्यासाठी वन व वन्यजीव विभागाचे दोन पथके मागील दोन महिन्यापासून प्रयत्न करीत आहे. या पथकांमध्ये २० ते २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्या परिसरात वाघिणीचे लोकेशन असते त्या परिसरात ही चमू दाखल होते त्या परिसरातील नागरिकांना सतर्क करण्याचे काम ही पथके करीत आहेत.