अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नवी उभारी घेईल – छगन भुजबळ



मुंबई,नाशिक,दि.५ जुलै :-* आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचे विठ्ठल आहे. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो. आम्ही भाजपात गेलेलो नाही. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. साहेब तुम्ही आवाज द्या, या बडव्याना बाजूला करा, आपण सत्तेत राहून जनेतेचे प्रश्न सोडवू . ज्याप्रमाणे नागालँड मध्ये परवानगी दिली तशी आम्हाला द्या पोटाशी धरा असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले.



राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा मेळावा मुंबईतील एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात पार पडला. यावेळी ते बोलत होते.



यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, मंत्री अनिल पाटील, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अदितीताई तटकरे, माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे यांच्यासह आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



यावेळी प्रास्ताविक करतांना छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आमदारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री पदाची शपथ घेतली. याबाबत सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र लवकरच या गोष्टींचा उलगडला होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ४० पेक्षा जास्त आमदार आपल्या सोबत आहे. आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काम कसं करू शकतो, कायदे आम्हालाही कळतात. याचा सर्व विचार करून पुढच पाऊल आपण उचललं आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नव्या दमाने वाटचाल करेल असे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. गेल्या काळात अजितदादा पवार व स्वतः पवार साहेबांनी सांगून सुद्धा सद्याच्या कारभाऱ्याकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जात नव्हत्या. त्यामुळे पक्ष काम कसं करणार. सांगून सुद्धा काम होत नव्हत. त्यामुळे काम होत नसल्याने जबाबदारी घेण्याची तयारी अजितदादा यांनी दाखविली. तसेच मी ही सर्व समाजाच्या घटकांना सामवून घेण्याबाबत सांगितले होते. आता अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं जाईल. आज सुनील तटकरे यांच्या सारख्या ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली यापुढील काळात सर्व समाजाला सोबत घेऊन संधी दिली जाईल असे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, सन १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होतो. त्यावेळी समीर पंकज यांच्यासह साथीदारांनी यशस्वी नियोजन केले. आणि पक्ष पुन्हा उभारी घेतांना हे सर्व झोपलेले नाही ते यशस्वी नियोजन करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, पक्ष स्थापनेनंतर अधिक वेळ मिळाला असता तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष असता. त्यावेळी कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन करून मंत्री पदाची शपत घेतली. सत्ता आल्यानंतर लगेच प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र आत्ताचे प्रांतअध्यक्ष पाच वर्षाहून अधिक काळ बदलला जात नाही. खालचे पदाधिकारी बदलले जातात. मात्र प्रदेशाध्यक्ष मात्र त्या जागेवर राहिले. एकीकडे भाकरी फिरविण्याची भाषा केली जाते. मात्र रोटला जर जागेवर असेल तर कसं होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


ते म्हणाले की, सन २०१४ च्या अगोदर एकत्र निवडणुका लढवीत असतांना सन २०१४ ला आपण मित्र पक्षांची साथ का सोडली ? सन २०१९ साली सकाळचा शपतविधी का झाला ? गुगली टाकून आपल्याच गड्याचे खच्चीकरण का ? असे सवाल उपस्थित केले. एकीकडे दिल्लीत चर्चा करायची. काही निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय पुन्हा निर्णय मागे घेतला जातो त्यामुळे नेते तोंडघाशी पडले याचा विचार मात्र केला जात नाही. सत्तेत गेलो तरच आपण जनतेची सेवा करू शकतो असे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे सत्तेत राहून प्रश्न सोडविण्याचा निर्णय आपण घेतलाय असे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, आम्ही भाजप मध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये स्थानिक पक्षाच्या नेतृवाखाली सत्ता स्थापन झाली. त्यात भाजपचे लोक आहे. त्यात आपल्याही पक्षाच्या लोकांना सहभाग घेतला. मग इथे का नाही असा सवाल उपस्थित करत आपली विचारसरणी कायम राहिली पाहिजे. धरसोड वृत्ती नको असे त्यांनी सांगितले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक प्रलोभने समोर असतांना आम्ही पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. आज साहेबांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. आजही आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम कायम आहे. पवार साहेबांनी जेव्हा वसंतदादा यांची साथ सोडली तेव्हा त्याचंही मन दुखवल गेलं. तसेच ज्या स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.मासाहेब यांना आईवडिलांचे स्थान दिले. त्यांना सोडून ओबीसींच्या सोबत आलो तेव्हा त्यांची देखील मने दुखावली गेली. आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत, ते रस्त्यावर लढून काम करण्यापेक्षा सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, अनेक लोक आज म्हणत असतील की, भुजबळ सत्तेत सहभागी झाले आता ओबीसींच काय तर मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे काम हे राज्यात आणि देशात आपण अधिक मजबूत करणार असून ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायम लढत राहू असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post