निवड यादीतील प्रशिक्षणार्थी शासकीय अधिकारी-कर्मचारी आढळल्यास कारवाई होणार : महाज्योती

 निवड यादीतील प्रशिक्षणार्थी शासकीय अधिकारी-कर्मचारी आढळल्यास कारवाई होणार : महाज्योती





महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरच्या निवड यादीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नावे असल्याबाबत आणि पगारा सोबतच शिष्यवृत्ती घेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे. संस्थेकडून निवड यादीत प्रशिक्षणार्थी हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी असून सुद्धा वेतनासोबत शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत अश्यांवर संस्थेकडून पडताळणी करू योग्य कार्रवाई करण्यात येणार, असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिली. 



श्री. खवले यांनी सांगितले की, या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की नुकताच महाज्योतीचा यूपीएससी, एमपीएससी, गट ब आणि क प्रशिक्षणाबाबतचा निकाल जाहीर झालेला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत प्रशिक्षण संस्थांना रुजू होण्याकरिता वेळ देण्यात आलेला आहे. सद्यास्थितीमध्ये कोणतेही विद्यार्थी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला पगारासोबत शिष्यवृत्ती देण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. तथापि शासन सेवेमध्ये तसेच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी महाज्योतीच्या शिष्यवृत्तीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून अशा उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळणार नाही अशा आशयाचे परिपत्रक महाज्योतीने यापूर्वीच निर्गमित केलेले आहे.


 तर नाव बाद करण्यात येणार

एखादा प्रशिक्षणार्थी नोकरी करत असेल, शासन सेवेत असेल आणि तरीही माहिती लपून तो जर प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहिला तर प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्याचे नाव बाद करण्याची कारवाई करण्यात येईल. या अनुषंगाने एखादा शासकीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत असल्याबाबतची माहिती कोणाकडेही उपलब्ध असल्यास ती माहिती महाज्योती कार्यालयाकडे कळविण्याबाबतचे आवाहन करण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ देणे हे महाज्योतीचे धोरण आहे. कोणत्याही प्रकारचा अपात्र विद्यार्थी प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे संस्थेकडून कळिवण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post